आमच्या लाडक्या हरपळे बाई – एक आदर्श महिला

जागतिक महिला दिन. संपूर्ण जगातील महिलांना सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार हे ठामपणे सांगणारा दिवस. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, हे मी काही नव्याने सांगण्याची गरज नाही. उलट अनेक यशस्वी पुरुषांच्या गाथा ह्या स्त्रीयांमुळेच घडल्यात. आमच्या हरपळे बाई अगदी अशाच. हरपळे गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून आत्तापर्यंत साथ देत राहिल्या. त्यांच्याबद्दल गावातील विद्यार्थ्याला आणि पालकाला आपुलकी वाटली नाही तर नवलच.

सौ. रजनी महादेव हरपळे अशी सरळ साधी सही आणि तशीच वागणूक आणि राहणीही . त्यांच्या अक्षराला असणार वळण त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्याला लावण्याचा प्रयत्न केलाय. कपाळावर मोठ गोल कुंकू कदाचितच एखादी शिक्षित स्त्री लावत असेल . साधी साडी आणि वेणीतही त्यांची व्यक्तिमत्त्वाची छाप पडल्याशिवाय राहत नाही . जेजुरी सारख्या शहरात शिकवण्याचे काम केल्यावर स्वतःहून गुरुजींबरोबर पिंपरी सारख्या गावात काम करण्याचा ध्यास घेतला आणि गावातील शाळेला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षितच नाही तर सुसंस्कृत म्हणून जगण्याचा मार्ग दिला.

मला तशा त्या रोज शिकवायला म्हणजे वर्गशिक्षिका नव्हत्या. पण तरीही त्याचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असायचं . गुरुजींच्या वर्गात असल्यान आणि आमच्या वर्गाकडून अधिक अपेक्षा असल्यान त्याचं लक्ष नेहमी असायचं .४ थीत असताना तशा त्या आमच्या शिष्यवृत्तीच्या तासाला शिकवणी घ्यायच्याच. एकदा अचानक गुरुजींबरोबर बारभाई गुरुजी आले. ते रिटायर झालेले होते. पण नंतर कळल कि बाई आजारी आहेत , तेव्हा काही दिवस ते शिकवणार अहेत. प्रत्येक विद्यार्थी तेव्हा दुखी नसेल अस होन शक्यच नव्हत. कारण घरी जशी आई तशा शाळेत बाई होत्या. त्यांच्या लळ्यामुळे बरीच मुले शाळेची वाट चालू लागले होते.

आमची ‘ टोळी’ तशी त्यांची लाडकी , कारण सांगितलेलं काम मीच करणार अशी आमच्यात धडपड . शाळेत शिक्षकांनी सांगितलेले काम म्हणजे भारतरत्नच ! मला अजूनही आठवत आम्ही रोज शाळा सुटल्यानंतर वरांढयात अभ्यास करत बसायचो . गुरुजी आणि बाई जाईपर्यंत . अभ्यासू होतो म्हणून नाही तर अजून एक स्वर्गासुखाहून प्रिय गोष्ट आम्हाला करायला मिळायची . ती म्हणजे सगळ्या शिक्षकांना टा टा करायचा . टा टा………. बाई ………. म्हणाल्यावर बाई जेव्हा गाडीवरून हाताने टा टा करायच्या . तेव्हाच आमची शाळा सुटायची आणि आम्ही घराकडे मार्गस्थ व्हायचो . हे वेड असेल किंवा काही … पण त्या व्यक्तींची आणि क्षणांची सर परत कोणालाच आणि कशालाच आली नाही.

आता मागे बाई रिटायर झाल्या . पुतणी सांगत होती कि , आम्ही खूप रडलो . त्यात नवल ते काय ? आम्ही असताना बाई रिटायर झाल्या असत्या तर आमच्याही अश्रुंचे बांध केव्हाच कोसळले असते . आणि मला माहितेय , पालक आणि विद्यार्थ्यांच्या शुभेछ्यासह त्यांनाही जायला जड वाटत असेल . गहिवरून आल असेल . परंतु अशा शिक्षिका खरच भाग्यान लाभतात .

यश मिळाल्यावर आजी जसे तोंड भरून कौतुक करायची तशाच त्याही करायच्या . पण रागावल्यावर मात्र त्या काही बोलल्या तरी रडू फुटायचं . त्या कधीच कोणाला सहसा मारत नसत आणि आम्हाला तर नाहीच नाही … पण त्या थोड्या जरी रुसल्यात असा वाटला कि गंगा यमुनाचा उगम झालाच . शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेवेळी एकदा मार्क कमी पडले , अगोदर त्याच इतक वाईट वाटल नाही . पण बाई म्हणाल्या ,’ भरवश्याच्या म्हशीला टोणगा ‘ . त्यानंतर जे रडू आल ते अजूनही आठवत . आणि प्रज्ञाशोध परीक्षेच्या निकालानंतर केलेलं कौतुकही

एखाद्या व्यक्तीचा लळा का लागतो इतका . खरच कळत नाही . हायस्कूल मध्ये गेल्यावरही आम्ही सुरुवातीला छोटी सुट्टी , मोठी सुट्टी सारखा मराठी शाळेकडे पळायचो का तर ? आमच्या बाई आणि गुरुजींना भेटायचं .

मला माझ्या स्वतःचाच अभिमान वाटतो कि मला असे गुरुजन लाभले . मी या महिला दिनाला सर्व महिलांना आमच्या बाईंचा आदर्श ठेवायला सांगीन . सर्व प्रेम आणि आपुलकीसह जागतिक महिला दिनाच्या शुभेछ्या .

( वर नमूद केलेली टोळी अजूनही या आठवणींवर तासंतास गप्पा मारते त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी काल परवा झाल्यासारख्याच वाटतात).

This entry was posted in A-Spectra. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>